एमपीएससीची परीक्षा २१ मार्चला होणार

मुंबई: १४ मार्चला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा तीन दिवसांवर असताना राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने राज्यभरात विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान आता ही परीक्षा २१ मार्च होणार आहे. काल एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, यामुळे सरकारची चांगलीच नाचक्की झाली. त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४ मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली, मात्र खबरदारीचे सर्व उपाय करून परीक्षा घेण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यांनतर आज शुक्रवारी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

११ एप्रिलला होणारी परीक्षा नियोजित वेळेतच घेण्यात येणार आहे. यापुढील परीक्षा ह्या नियोजित वेळेतच घेण्यात येणार आहे.

परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. सरकारकडून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरु आहे. सरकार गंभीर नसल्याचे आरोप झाले.