मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि सरकारी नोकरभरती घोटाळ्याविरोधात पुण्याहून मुंबईला निघालेला विद्यार्थ्यांचा लाँग मार्च मुंबई पोलिसांनी काल मुलुंड टोलनाक्यावर रोखला. आंदोलन करण्यास परवानगी नसल्याचे सांगत मुलुंडच्या नवघर पोलिसांनी ४० ते ५० विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना प्रभादेवीच्या भूपेश गुप्ता भवन येथे रात्रभर ठेवले. आज सकाळी १० वाजेनंतर त्यांना सोडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुणे ते मुंबई दरम्यान मोर्चा
एमपीएससीतील डमी रॅकेट प्रकरण, नांदेड पोलिस भरती, परिवहन निरीक्षक भरती आणि शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा याविरोधात सरकारी नोकरी भ्रष्टाचारविरोधी संघर्ष समितीने आंदोलन छेडलं आहे. या घोटाळ्यांची चौकशी करुन गुन्हेगारांना शिक्षा द्यावी, या मागणीसह विविध मागण्यांसाठी १९ ते २४ मे दरम्यान पुणे-मुंबई लाँग मार्च काढला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड सहभागी
१९ मे रोजी पुण्यातील डेक्कनच्या नदीपात्र चौपाटी इथून लाँग मार्चची सुरुवात झाली होती. हा मोर्चा गुरुवारी रात्री मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचणार होता. यानंतर विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना दिले जाणार होते. मात्र त्यापूर्वीच हा मोर्चा पोलिसांनी अडवला. दरम्यान, आंदोलक विद्यार्थी आज पुन्हा आझाद मैदानावर जमणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील या मोर्चात ठाण्यात सहभागी झाले होते. पोलिसांनी दाखवलेल्या या दंडेलशाहीचा त्यांनीही कठोर शब्दात विरोध केला.