नवी दिल्ली-‘मु्द्रा योजना’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची अत्यंत महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेमुळे अनेकांना स्वयंम रोजगार मिळाला परंतु, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी या योजनेवरच टीका केली आहे. संसदीय समितीला पाठवलेल्या उत्तरात राजन यांनी मुद्रा कर्ज, किसान क्रेडिट कार्डसारख्या मोदी सरकारच्या योजनांमुळे बँकांच्या थकीत कर्जात (एनपीए) वाढ होईल आणि बँकांची स्थिती आणखी नाजूक होईल, असे नमूद केले आहे.
रघुराम राजन यांनी बँकांच्या एनपीएसाठी तत्कालीन यूपीए सरकारला जबाबदार ठरवले आहे. मोदी सरकारवर देखील त्यांनी टीकेची झोड उठविली आहे.
लोकसभेच्या संसदीय समितीने राजन यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून बँकांच्या एनपीएबाबत आपली भूमिका मांडण्यास सांगितले होते. नंतर पत्राद्वारे भूमिका मांडण्यास समितीने त्यांना सूटही दिली होती. त्यानंतर राजन यांनी एनपीएबाबत अत्यंत सखोल उत्तर लोकसभा समितीला दिले.
मुद्रा कर्ज आणि किसान क्रेडिट कार्ड लोकप्रिय आहे. पण यामुळे कर्ज जोखीम वाढण्याची शक्यता पाहता त्याचे सूक्ष्म परीक्षण करायला हवे. याचपद्धतीने सेबीद्वारे चालवण्यात येत असलेली एमएसई क्रेडिट गॅरंटी स्कीममध्येही थकबाकी वाढत आहे. यावर त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे, असा इशारा त्यांनी दिला.