मुक्ताई प्राणप्रतिष्ठा सोहळा म्हणजे एक यज्ञ आहे.. ह भ प डॉ. रवींद्र भोळे महाराज

दिघी पुणे: विपरीत परिस्थितीत विचलित न होता कर्तव्य कर्म करीत राहणे व परमोच्य पदावर आरुढ होऊन सुद्धा पाय जमिनीवर ठेवून वागण्याचा मंत्र मुक्ताईने जगाला दिला. मुक्ताईने ताटीचे अभंग लिहून कर्तव्य परांमुख होणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वरांना कर्तव्य कर्म करण्याचा महान सल्ला देऊन ब्रह्मज्ञानाचे भांडार जगासाठी मुक्त केले. नाथ संप्रदायातील मुक्ताई ह्या पहिल्या श्री संत आदिशक्ती ठरल्या. अलंकापुरीच्या या पवित्र परिसरात श्री संत आदिशक्ती मुक्ताई च्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या भूमीत आज श्री संत मुक्ताई प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. येणाऱ्या भावी पिढीला हे मंदिर चैतन्य मय स्फुर्तीचा जिवंत झरा ठरेल व साधकाला योग्य दिशादर्शक देवस्थान ठरेल ह्यात शंका नाही. मुक्ताई प्राणप्रतिष्ठा सोहळा म्हणजे एक यज्ञ आहे, असे मत जेष्ठ प्रवचनकार समाजसेवक ह भ प डॉ रवींद्र जी भोळे यांनी येथे व्यक्त केले.

 

भोसरी आळंदी रोड दिघी येथे श्री संत आदिशक्ती मुक्ताई प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ह्या प्रसंगी ‘योगी पावन जगाचा ‘या ताटीच्या अभंगावर ह भ प डॉ.रवींद्र भोळे यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. यापुढे मार्गदर्शन करताना डॉ. रवींद्र भोळे म्हणाले की नाथ संप्रदायातील सद्गुरु पदावर पोहोचलेल्या श्री संत मुक्ताई या पहिल्या श्री संत होत. अशा विभूतीच्या नावे मंदिर होऊन प्राणप्रतिष्ठा होणे हा वारकरी सांप्रदायातील भक्तांना एक अलभ्य लाभ आहे. ह्या यावेळी एक लक्ष दीप प्रवचनाचा कार्यक्रम होउन ह्या नयनरम्य व चैतन्यमय कार्यक्रमात अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले . या अभौतिक व अलौकिक सुखाचा अनुभव सर्वांनी घेतला.आदिशक्ती मुक्ताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल विष्णू पाटील, कार्यकारी मंडळ सदस्य सचिन पाटील, उद्धव नारखेडे ,संदीप बराटे , ,श्रीराम पाटील, चांगो बेंडाळे, लाला पाटील,अरविंद कोलते ,दीपक नाफडे ,सागर पाटील, पुरुषोत्तम बेंडाळे ,चेतन चोपडे यांनी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. महाप्रसाधनंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला अनेक भाविक भक्त प्रामुख्याने उपस्थित होते.