कर्नाटकच्या विजयाचा मुंबई भाजप कार्यालयात जल्लोष

0
पेढे वाटून, ढोल ताशाच्या गजरात केले सेलिब्रेशन 
मुंबई:- कर्नाटकमध्ये काँग्रेसला धूळ चारत मोठ्या प्रमाणावर जागा जिंकल्यानंतर देशभर विजयाचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. मुंबईत देखील भाजप प्रदेश कार्यालयात  भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अनेक भाजप आमदार व शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर ढोल-ताशे वाजवून आणि एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी महिला नेत्या आणि कार्यकर्त्यांनी फूगडी खेळून विजयाचा आनंदोत्सव साजरा केला आणि हर हर मोदी घर घर मोदीच्या घोषणा देखील  दिल्या. सकाळपासूनच भाजप कार्यालयात मोठ्या स्क्रिनवर निकालाचे अपडेट दिले जात होते. निकाल जसजसे भाजपच्या बाजूने येत होते तसतसे भाजप कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधान येत होते. निकाल आपल्या बाजूने स्पष्ट दिसायला लागल्यांनंतर  भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर फटाके फोडून आनंद साजरा केला.
भंडारा जिंकू ठोकून आणि पालघर जिंकू ठासून! – आमदार अॅड. आशिष शेलार
सीमा भागात भाजपाच्या मित्र पक्षांनी भाजप विरोधी प्रचार केला पण त्यांना जनतेने उलथून टाकले आहे. कर्नाटकाप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार  अॅड आशिष शेलार यांनी दिली. तसेच त्यांनी आता भंडारा जिंकू  ठोकून  आणि पालघर जिंकू ठासून, असा दावा देखील केला.   शेलार म्हणाले की, कर्नाटकच्या विजयाचे एका वाक्यात वर्णन करायचे तर “विरोधकांच्या घरात घुसून चारी मुंड्या चित करून मिळवलेला हा विजय आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणार्‍यांची तोंडे बंद करणारा हा विजय आहे.  कर्नाटकच्या सर्वच भागातील जनतेने जसा विश्वास दाखवला तसाच विश्वास बेळगाव आणि सीमा भागातील जनतेनेही दाखवला आहे. या विजयानंतर दक्षिण भारतातील आपले यश भाजपाने सिध्द केले आहे, असे ते म्हणाले.