मुंबई: लोकसभेतील पराभवाची जबाबदारी घेत माजी मंत्री कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे देवरा यांनी स्पष्ट केलेआहे. तसेच राजीनामा देतानाच आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहर युनिटचे निरीक्षण करण्यासाठी तीन वरिष्ठ नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वाची तात्पुरती स्थापना करण्याची सूचनाही त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
देशभरात काँग्रेसचा मोठा पराभव झाल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्याची लाटच आली होती. काँग्रेसच्या अनेक राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे सादर केले होते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मुंबईत एकही जागा जिंकता आली नव्हती. निवडणुकीच्या ऐन तोंडावर मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले होते. तरीही काँग्रेसला सपाटून मार खावा लागला होता.
देवरा यांनी २६ जून रोजी राहुल गांधी यांची भेट घेऊन लवकरच पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. देवरा यांनी तशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे आणि के.सी. वेणुगोपाल यांना दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. उशिरा संधी मिळाल्याने निवडणुकीची तयारी करण्यास वेळ मिळाला नाही, असंही त्यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे.