हैदराबाद : आयपीएल १२ व्या मोसमाचा विजेता काल मुंबई इंडियन्स संघ ठरला. चेन्नईला पराभूत करत मुंबईने चौथ्यांदा आयपीएलचा किताब पटकाविला आहे. अतिशय अटीतटीचा हा सामना झाला. शेवटच्या १ चेंडूत २ धावांची आवश्यकता असतांना शार्दुल ठाकूर बाद झाला आणि मुंबई संघ विजेता ठरला. अंतिम सामन्याचा नायक ठरला तो लसिथ मलिंगा. त्याने अखेरच्या षटकात ९ धावा काढू दिल्या नाही. हे अखेरचे षटक मलिंगाने न टाकता हार्दिक पांड्याने टाकावे असा विचार रोहित शर्माने केला होता, परंतु तो निर्णय त्यांनी बदलला आणि तो फायद्याचा ठरला.
मुंबईच्या 149 धावांचा पाठलाग करताना चेन्नईकडून शेन वॉटसनने दमदार खेळ केला. त्याने अखेरपर्यंत खिंड लढवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. चेन्नईला अखेरच्या षटकात विजयासाठी 9 धावांची गरज होती. रोहितकडे मलिंगा आणि पांड्या हे दोन पर्याय उपलब्ध होते. पांड्यानं त्याच्या एका षटकात 3 धावा दिल्या होत्या, तर मलिंगाने तिसऱ्या षटकात 20 धावांची खैरात वाटली होती. त्यामुळे हे अखेरचं षटक कोणाला द्यायचे या बुचकळ्यात रोहित पडला होता. सुरुवातीचा त्याचा कल पांड्याकडे झुकलेला, परंतु त्याने निर्णय बदलला आणि मलिंगाच्या हाती चेंडू सोपवला.