मुंबई: वीज पुरवठा करणारे ग्रीड फेल झाल्याने मुंबईसह आसपासच्या शहरांमधील वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्याचा सर्वाधिक फटका लोकल रेल्वे सेवा, रुग्णालये तसेच विद्यार्थ्यांना बसला आहे. चार तासांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने मुंबईकरांचे मोठे हाल झाले. सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेले नोकरदार वर्ग स्टेशनवरच अडकला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तांत्रिक कारणाची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल असे सांगितले. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. रुग्णालये आणि रेल्वेसाठी वीजपुरवठा सुरु करण्याला प्रथम प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
आजपर्यंत मुंबईत असे घडले नाही, प्रथमच ही घटना घडली आहे. यामागे काय कारण होते? याचा शोध घेतला जाईल. यामागे बेजबाबदारपणा असेल तर कारवाई केली जाईल असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. काही ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत झाला असून उर्वरित भागातील वीजपुरवठा तासाभरात पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.
मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाल्यावरून भाजपने सरकारला लक्ष केले आहे. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाकडून याचे भांडवल केले जात आहे. मात्र तांत्रिक अडचण निर्माण होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही परंतु वीजपुरवठा सुरळीत करण्याची कामगिरी युद्धपातळीवर सुरु आहे असे नितीन राऊत यांनी सांगितले.