मुंबई-मागच्या काही काळापासून आर्थिक अडचणीत सापडलेल्या अंधेरी मरोळ येथील प्रसिद्ध सेव्हन हिल्स हॉस्पिटलची लवकरच विक्री होणार आहे. या हॉस्पिटलच्या खरेदीसाठी रिलायन्स समूहाने पुढाकार घेतला आहे. नीता अंबानी यांच्या अध्यक्षतेखालील रिलायन्स फाऊंडेशनने सेव्हन हिल्सच्या खरेदीसाठी इच्छुक असल्याचा अर्ज सादर केला आहे.
कर्जाच्या डोंगराखाली
रिलायन्ससह एकूण १५ कंपन्यांनी सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या खरेदीची तयारी दाखवली आहे. सेव्हन हिल्स हे मुंबईतील पहिले सेव्हन स्टार रुग्णालय आहे. मुंबई महापालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रीसाठी सेव्हन हिल्सची २,१०० कोटी रुपये बेस प्राईस ठरवण्यात आली असून जितेंद्र दास मगंती यांच्यासह मुंबई महापालिकेचाही या हॉस्पिटलमध्ये शेअर आहे. सेव्हन हिल्स हेल्थकेअरने बँकेचे १,३०० कोटींचे कर्ज थकवल्यामुळे राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या हैदराबाद खंडपीठाने सेव्हन हिल्स रुग्णालयाला दिवाळखोर म्हणून घोषित केले आहे.
जे.पी.मॉगर्न चेस, अपोलो हॉस्पिटल, मनिपाल हॉस्पिटल, नारायण हेल्थ, बेन कॅपिटल, एआयओएन कॅपिटल आणि अॅस्टर डीएम हेल्थकेअर या कंपन्यांनी सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या खरेदीमध्ये रस दाखवला आहे.
१७ एकरच्या प्लॉटवर
मागच्याच महिन्यात रिलायन्स फाऊंडेशनच्या टीममधील आर्किटेक्ट आणि इंजिनिअर्सनी हॉस्पिटलची पाहणी केल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. अंधेरीतील महापालिकेच्या १७ एकरच्या प्लॉटवर खासगी-सार्वजनिक भागीदारी अंतर्गत हे हॉस्पिटल बांधण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ हे हॉस्पिटल आहे. मागच्या वर्षभरापासून ५० डॉक्टरांना वेतन मिळालेले नसून ओपीडी सुद्धा बंद आहे. औषधे आणि अन्य वैद्यकीय उपकरणे पुरवणाऱ्यांनाही मागच्या काही महिन्यांपासून त्यांचे पैसे मिळालेले नाहीत.