जुने आमदार निवासाच्या जागेवर नगरपंचायतीने पुन्हा नव्याने भाजीविक्रेत्यांसाठी ओटे व व्यापारी गाळे उभारावेत—माजी नगराध्यक्षांसह नगरसेवकांची मागणी
शिंदखेडा (प्रतिनिधी) नगरपंचायतीच्या वतीने बांधण्यात आलेल्या महात्मा फुले भाजी मार्केट व व्यापारी गाळयांचे लिलाव जुलै महिन्याच्या अखेरीस करण्यात आले. मात्र अनेक भाजी विक्रेते व व्यापारी यापासून वंचित राहिल्यामुळे जुने आमदार निवासाच्या जागेवर नगरपंचायतीने पुन्हा नव्याने भाजीविक्रेत्यांसाठी ओटे व व्यापारी गाळे उभारावेत अशी मागणी माजी नगराध्यक्ष रजनी वानखेडे यांच्यासह नगरसेवकांनी केली आहे.
शिंदखेडा नगरपंचायतीची मुदत फेब्रुवारी मध्ये संपल्यानंतर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी बिडगर काम पाहत आहेत. नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांनाजीक बांधण्यात आलेल्या 59 भाजी विक्रेत्यांसाठीचे ओटे व 30 व्यापारी गाळयांचे जुलै महिन्याच्या अखेरीस लिलाव करण्यात आला. अपेक्षेप्रमाणे अनेक भाजी विक्रेते व व्यापाऱ्यांना गाळे न मिळाल्यामुळे ते वंचित राहिले. वंचित राहिलेल्या भाजीविक्रेते व व्यापारी पुन्हा आपली दुकाने स्टेशन रोडच्या दोन्ही बाजूला लावतील की काय अशीच परिस्थिती आहे. वंचित राहिलेल्या भाजीविक्रेते व फळ विक्रेते यांच्यासाठी रिकामी असलेली जुन्या आमदार निवासाच्या जागेवर नगरपंचायतीने भाजी मार्केट व व्यापारी गाळे उभारून शहरातील बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर माजी नगराध्यक्ष रजनी वानखेडे, नगरसेवक उल्हास देशमुख,प्रकाश देसले, भिला माळी,विनोद पाटील ,अर्जुन सोनवणे, प्रविण माळी, भुपेंद्र राजपुत यांच्या सह्या आहेत.
.