पिंपरी l राज्यातील बहुतेक सर्वच महानगरपालिकांच्या मुदती संपुष्टात आल्या असल्या तरीही कोरोनाची महासाथ, सणासुदीचा कालावधी आणि पावसाळा या कारणांमुळे राज्यातील महापालिकांच्या निवडणुका बऱ्याच लांबीवर पडल्या.
अर्थात याच काळात राज्यात घडलेल्या बऱ्याच अंशी अनपेक्षित आणि वेगवान राजकीय घडामोडी हे त्यामागील सर्वात महत्त्वाचे कारण आहे. मात्र, आता सप्टेंबर अखेर ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत या निवडणुकांना मुहूर्त लागेल असे संकेत खुद्द सत्ताधाऱ्यांच्या गोटातूनच मिळत आहेत.
दीर्घकाळ या महापालिकेची सत्ता आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या शिवसेनेत फूट पडल्याने यावेळी उद्धव ठाकरे गट किंवा महाविकास आघाडी मुंबईची सत्ता राखणार की भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपाने मुंबई ताब्यात घेण्यासाठी चंग बांधला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला आपली उत्सुकता सिद्ध करण्यासाठी मुंबईत उल्लेखनीय कामगिरी करून दाखवावी लागणार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिकांच्या निवडणुकांवरही राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे. दोन्ही महापालिकेत भाजपाची निर्विवाद सत्ता असूनही राज्यात बदललेली राजकीय समीकरणे आणि प्रामुख्याने कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका यामुळे भाजप काहीसा चिंतेत आहे तर विकास आघाडीच्या गोटात उत्साह संचारला आहे.
मुंबईसह पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका रंगतदार ठरण्याची लक्षणे आहेत. याशिवाय महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडूनही इतर काही छोटे पक्ष आणि स्थानिक पातळीवर प्रभाव असलेले नेते यांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेतच. त्यात कोणाला किती यश मिळेल यावरही या दोघांची महापालिका निवडणुकीतील कामगिरी अवलंबून राहणार आहे.