पिंपरी : पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा धारधार हत्याराने वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास चिंचवड पोलिस चौकी समोर घडली. आकाश लांडगे (20, रा. चिंचवडगाव) याचा खून झाला आहे. याप्रकरणी प्रशांत वीर यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रणजित बाबू चव्हाण (वय 27 चिंचवड), स्वप्नील ऊर्फ बाबा मोरे (वय 23 चिंचवडगाव), प्रफुल्ल ढोकणे, सोन्या वराडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आणि रणजित व इतरांमध्ये मागील काही दिवसांपासून भांडणे होती. मंगळवारी रात्री आकाश हा चाफेकर चौकात दुचाकीवरून जात होता. त्यावेळेस दोन दुचाकीवरून आलेल्यांनी चौघांनी त्याला अडविले व त्याच्यावर कोयता आणि रॉडने आकाशवर वार केले. तसेच सिमेंटची कुंडी आकाशच्या डोक्यात मारली. यात आकाश गंभीर जखमी झाला. या प्रकारानंतर त्याला उपचारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असताना आज पहाटे तीनच्या सुमारास आकाशच मृत्यू झाला. हा प्रकार चिंचवड पोलिस चौकीच्या समोर आणि पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडला. यावरुन गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आहे याचा अंदाज येतो. यातील रणजीतवर ८ गुन्हे तर बाबा मोरे याच्यावर २ गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.