बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या निमित्ताने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बंगळुरुत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांच्यावर हल्लाबोल केला. १५ मिनिते मातृभाषेत बोलण्याच्या पंतप्रधानांच्या आव्हानावरही राहुल गांधींनी उत्तर दिले.
राहुल यांनी हातात कागद न घेता कोणत्याही भाषेत १५ मिनिटं बोलावे , वाटल्यास मातृभाषेत बोलावे , पंतप्रधान मोदींच्या या टिप्पणीवरही काँग्रेस अध्यक्षांनी उत्तर दिले. “माझी आई इटालियन आहे. पण तिने आयुष्यातील मोठा काळ भारतात घालवला आहे. अनेक भारतीयांपेक्षा ती जास्त भारतीय आहे. माझ्या आईने देशासाठी मोठा त्याग केला आहे आणि खूप काही सहन केले आहे. जर पंतप्रधानांना माझ्यावर अशी टिप्पणी करुन आनंद मिळतो, तर त्यांनी करत राहावे.
विजय आमचाच
मोदींवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधान कर्नाटकमधील जनतेच्या मुद्द्यांवर बोलत नाहीत, तर त्यांची दिशाभूल करत आहेत. ते बुलेट ट्रेन, सी प्लेनच्या गोष्टी करतात. तर शिक्षण, रोजगार, महिलांची सुरक्षा, शेतीसाठी पाणी यांसारख्या सामान्यांच्या मुद्द्यांवर मौन बाळगतात यादरम्यान राहुल गांधींनी कर्नाटकच्या जनतेकडून फार काही शिकल्याचं म्हटलं. “कर्नाटकात फिरुन आम्ही जनतेचं मत जाणून घेतलं आणि त्यांचा आवाज घोषणापत्रात सामील केला. भाजपने आपल्या घोषणापत्राची कॉपी केली आहे,” असा दावा राहुल गांधी यांनी केला. राज्यात आमचाच विजय होईल,” असा विश्वासही काँग्रेस अध्यक्षांनी व्यक्त केला.