पावसाळी अधिवेशनात विरोधक धो-धो बरसणार!

0

सत्ताधाऱ्यांना घेरण्याची नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांची रणनीती
अनेक वादग्रस्त प्रकल्प, मंत्र्यांची वादग्रस्त प्रकरणे, राज्यात वाढत्या गुन्ह्यांच्या घटना सरकारला नाकेनऊ आणणार

निलेश झालटे, मुंबई : नागपूर येथे बुधवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची जोरदार रणनीती विरोधकांनी आखली असून अनेक मुद्दे आयतेच हातात आल्याने विरोधकांकडे मजबूत अस्त्र हाती आली आहेत. महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ या नेहमीच्या कोकणातील नाणार प्रकल्प, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, मराठा आरक्षण, प्लास्टिक बंदी, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा सोलापूरातील अवैध बंगला, बुलेट ट्रेनला स्थानिकांचा होत असलेला प्रखर विरोध यासह अनेक मुद्दे घेऊन या पावसाळी अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांवर धो-धो बरसण्याची शक्यता आहे तर या माऱ्याचा सामना करण्यासाठी सरकार देखील सज्ज आहे. प्रभावी नेते छगन भुजबळ बाहेर आल्याने विरोधी पक्षाची ताकत वाढली आहे तर एकनाथराव खडसे यांच्यासारख्या बेडर नेत्यांसह शिवसेनेशी सामना करताना सत्ताधाऱ्यांची दमछाक होणार हे निश्चित आहे. दरम्यान, अनेक वर्षांनंतर पावसाळी अधिवेशन नागपुरात होत असल्याने उत्कंठा वाढीस लागली आहे. तर मुख्यमंत्र्यांना आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

11 जागांसाठी निवडणुकीचा बहर!
या पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या सदस्यांद्वारे निवडून द्यायच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 16 जुलैला निवडणूक होत आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली असली तरी 16 जुलै रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूका बिनविरोध होतात का याकडेच सर्व राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रित असणार आहे.

सत्ताधारी भाजप-सेना संघर्ष होणार
अधिवेशनात प्रामुख्याने कोकणातील नाणार प्रकल्पावरून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना संघर्ष पाहायला मिळणार आहे. नाणारवरून सरकारच्या भूमिकेचा शिवसेनेने वेळोवेळी विरोध केला आहे. तो या अधिवेशनात अधिक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. नुकत्याच झालेल्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीत 2 जागा मिळवल्याने आणि त्याआधी पालघर पोटनिवडणुकीत केलेल्या कामगिरीमुळे शिवसेनेची ताकत आणि आत्मविश्वास वाढला आहे. अधिवेशनात विरोधकांच्या भात्यात अनेक अस्त्रे असले तरी नाणार प्रकल्प आणि बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावर सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेवर विरोधकांचे डावपेच अवलंबून असणार आहेत.

मराठा आरक्षणासह अनेक मुद्दे गाजनार
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापले आहे. हा मुद्दा सध्या न्यायालयीन प्रकियेत आहे. तरीही सरकारने काही सुविधा देऊन मराठा समाजाचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आरक्षण ही मुख्य मागणी पूर्ण न झाल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या द्वारे तुळजापूर येथील पुन्हा एल्गार पुकारला आहे. मराठा आरक्षणासह कोरेगाव भीमा प्रकरणी संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाईसाठी पुन्हा आवाज उठण्याची शक्यता आहे. सोबतच कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांच्या अंगरक्षकाचा लातूर येथील घटनेत असलेला सहभाग, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा सोलापूरातील अवैध बंगला आदी प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखली असल्याने नागपूरातील होणारे पावसाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.

आश्वासने अन घोषणा निकाली निघणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र हगणदारीमुक्त झाल्याची केलेली घोषणा, राज्य सरकारने जाहिरातीवर केलेला वारेमाप खर्च, नाशिक येथून मुंबईत निघालेला शेतकऱ्यांचा आणि आदिवासींच्या मोर्चा त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या मोर्चेकऱ्यांना दिलेल्या आश्वासनावर काहीच कार्यवाही न झाल्याने विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. भीमा कोरेगाव दंगलीच्या तपासावरून आणि राज्यात मुले पळविण्याच्या अफवेमुळे धुळे येथील राईनपाडा येथे घडलेल्या मुद्द्यावरून विरोधक गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. यासोबतच बोंडअळी मदत, पीक विमा, शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या, विदर्भातील महत्वाचे प्रश्न, कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासाठी राष्ट्रीय बॅंका अपयशी ठरल्याचा मुद्दा, मुंबई विकास आराखडा, एम.एम.आर.डी.ए विकास आराखडा, सीआरझेड प्रारूप आराखडा, आदिवासी विभागात खरेदीत झालेला घोटाळा हे मुद्दे देखील प्रकर्षाने घेतले जाण्याची शक्यता आहे.

कडेकोट सुरक्षाव्यवस्था
नागपूरच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुरक्षा व्यवस्थेला अधिक महत्व आहे. यातच अधिवेशनाच्या काही दिवस आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या कथित धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. पोलीस प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केला आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण नागपुरात पोलीस सुरक्षा तैनात केली आहे. बंदोबस्तासाठी राज्यभरातून मोठा पोलीस फौजफाटा मागविण्यात आला आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यातून आलेल्या पोलिसांची निवास व व्यवस्था विशेष शाखेच्या वतीने केली आहे. अधिवेशनासाठी 2 हजार च्यावर अधिकारी व कर्मचारी बाहेरून मागविण्यात आले आहेत. याशिवाय होमगार्डसह शहरातील 2 हजार पेक्षा अधिक कर्मचारीही सुरक्षा व्यवस्थेत आहेत.