शिंदखेडयाची चिमुरडी नायरा विसपुते इंडिया बुक रेकॉर्डस ची मानकरी

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते चिमुकल्या नायराचा सन्मान

शिंदखेडा(प्रतिनिधी):-सध्या नाशिक येथे स्थायिक असलेली व मूळची शिंदखेडा शहरातील अडीच वर्षीय नायराची इंडिया बुक रेकॉर्डने दखल घेतली. ज्या वयात खेळायचे बागडायचे असते त्या वयात नायराच्या ३० हून अधिक संस्कृत श्लोक, देवांच्या आरत्या,हिंदी,मराठी गाणे , ए बी सी डी, वन टू टेन , इंग्लिश कविता तोंड पाठ आहेत. तसेच २०० हून अधिक वस्तू नावासह ओळखते.

मुळची शिंदखेडा येथील असलेली नायरा आपल्या आजी आजोबांसोबत आई-वडिलांसोबत नाशिक येथे वास्तव्यास आहे. दररोज आजी आजोबांसोबत मंदिरात देव दर्शनाला जाऊन व सायंकाळी संध्या वंदन करताना श्लोक व आरत्या आत्मसात केल्या. याशिवाय इंग्रजी एबीसीडी, कविता, व दोनशेहून अधिक वस्तूंची नावे नायरा या वयात देखील सहजपणे सांगते. नायराच्या आई-वडिलांनी व आजी आजोबांनी तिच्यातील हे गुण हेरून २० जुलै रोजी इंडिया बुक रेकॉर्ड साठी ऑनलाईन अर्ज केला व नायराचे फोटो व व्हिडिओ अपलोड केले. नायराने केलेल्या अर्जाची इंडिया बुक रेकॉर्ड कडून पडताळणी केली गेली आणि दोन ऑगस्ट रोजी नायराची या रेकॉर्ड साठी निवड झाल्याचे मेल तिला आला. त्यानंतर इंडिया बुक रेकॉर्ड कडून स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. नायराने मिळवलेल्या यशाचे कौतुक राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांनी केले.नायरा ही आजी जयश्री विसपुते व आजोबा श्रीराम विसपुते यांची नात तर राष्ट्रवादी कामगार सेनेचे नाशिक शहर कार्याध्यक्ष प्रांजल विसपुते व मोहिनी विसपुते यांची कन्या आहे.नायराचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.