10 दिवसानंतर प्रत्यक्षात साकारली 100 ची बनावट नोट ; झटपट श्रीमंत होण्याचा शार्टकट पडला महागात
जळगाव- युट्युबवर बनावट नोटा बनविण्याचा व्हिडीओ बघितला. त्यानुसार कलर झेरॉक्स मशीन तसेच साहित्य खरेदी केले. थोडेफार असलेल्या ज्ञानाचा वापर करुन तब्बल 10 दिवसाच्या सरावातून 100 रुपये दराच्या चलनातील खर्या नोटाची झेरॉक्स काढून त्यावरुन हुबेहुब दिसणारी बनावट नोट साकारली. अन् बनावट नोटा चलनात आणण्याची मोहिम संशयित अमजदखान अफजलखान व शेख रईस शेख रशीद रा. तांबापुरा या दोघा मित्रांनी फत्ते केली. झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट नोटांचा स्विकारलेला शार्टकट रईस व अमजदखान या दोघा मित्रांना महागात पडला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने दोघांच्या ‘आयडीयाच्या कल्पनेचा’ पर्दाफाश केला असून दोघांना अटक केली आहे.
एक बांधकाम मजूर तर दुसरा जिम चालवितो
तांबापुरा परिसरातील मोहम्मदीया नगरात अमजदखान अफजलखान वय 22 हा तरुण राहतो. आई, वडील व भाऊ असा त्याचा परिवार आहे. अमजदखान हा तांबापुरा परिसरातीलच एका जीममध्ये (व्यायामशाळेत) कामाला आहे. तर शेख रईस हा मच्छीबाजार परिसरात पत्नी व लहान मुलासह वास्तव्यास आहे. बांधकाम साईटवर मजूर म्हणून काम करुन त्याचा उदरनिर्वाह भागतो. अमजदखान व शेख रईस या दोघांमध्ये अनेक वर्षापासूची मैत्री आहे. गरीबी संपवायची व झटपट श्रीमंत व्हायचे या उद्देशाने दोघांनी युट्युबवर नवनवीन व्हिडीओ बघितले. याचदरम्यान त्यांनी बनावट नोटा तयार करण्याच्या व्हिडीओला बघितला अन् त्याचप्रमाणे नोटा तयार करण्याची योजना आखली.
घरात तयार करायच्या, ठेवायच्या जीममध्ये
व्हिडीओ बघितला त्यानुसार मोहिम फत्ते करण्यासाठी दोघांच्या पैशातून कलर झेरॉक्स मशीन घेतले. शेख रईस याचे दोन खोल्यांचे घर आहे. त्या घरातील मागच्या खोलीत दोघे रात्री बनावट नोटा तयार करत होते. व यानंतर नोटा तयार झाल्या की, एका बँगमध्ये त्या घेवून जावून जीममध्ये ठेवायचे. याठिकाणी संबंधिताला मागणीनुसार बनावट नोटा चलनात आणण्यासाठी दिल्या जात असल्याचीही माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे या प्रकारापासून रईसची पत्नी व अमजदखान याचे कुटूंबिय अनभिज्ञ होते. दोघांना पोलिसांनी अटक केल्यावर कुटुंबियांना हा प्रकार कळाल्याचेही समोर आले आहे.
महिनाभरापासूनच नोटा तयार केल्याची कबूली
स्थानिक गुन्हे शाखेचे बापू रोहम यांना तांबापुर्यात बनावट नोटा तयार होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांचे मार्गदर्शनाखाली कर्मचार्याचे पथक तयार केले. त्यानुसार पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद पाटील हे आठ दिवसांपूसन लक्ष ठेवून होते. 16 रोजी सायंकाळी रईस व अमजदखान दोघे शेरा चौकात असून त्यांच्याकडे नकली नोटा असलेली बॅग असल्याची पक्की खबर विनोद पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी वरिष्ठांना कळवित त्यांच्या सुचनेनुसार पथकासह दोघांना ताब्यात घेतले. यात आणखी काही गुन्हेगारांचा सहभाग आहे काय? दोघा संशयितांनी या नोटा कुठे चलनात आणल्य आहेत काय किंवा कुणाला दिल्या आहेत काय हे तपासात समोर येणार आहे.