तनुश्री-नाना पाटेकर वाद: नाना पाटेकर यांना महिला आयोगाकडून नोटीस

0

मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता यांच्या तक्रारीची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाकडून अभिनेते नाना पाटेकर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. तनुश्री दत्ता यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी लेखी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे तनुश्री दत्ता यांनी स्वत: आयोगासमोर उपस्थित राहून त्यांचे म्हणने मांडावे, अशी सूचना आयोगाने केली आहे. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या हॉर्न ओके प्लीज चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ता यांनी केला आहे.

तनुश्री दत्ता यांच्या तक्रारीनंतर महिला आयोगाने अभिनेता नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, निर्माता समीर सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांना नोटीस पाठवली. या चौघांना 10 दिवसांमध्ये आपली बाजू मांडण्याच्या सूचना आयोगानं केली आहे. तनुश्री दत्तानं आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर ही सूचना करण्यात आली. तनुश्रीनं तिच्या तक्रारीत या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केल्याचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे या प्रकरणात काय कारवाई केली, असा प्रश्न विचारत अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगानं पोलिसांना दिले आहेत.

चित्रपटसृष्टीतील अशा घटना रोखण्याची जबाबदारी निर्माते, दिग्दर्शक तसेच संबंधित संघटनांचीदेखील आहे. महिलांसोबत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच तक्रार करण्यासाठी यंत्रणा असणे आवश्यक आहे. यादृष्टीनेच कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा, २०१३ या कायद्यानुसार सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने तात्काळ अंतर्गत तक्रार निवारण समिती (आयसीसी कमिटी) स्थापन करावी असे निर्देश आयोगाने सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला दिले आहेत.