पुणे : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागला आहे. १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना सोपवला आहे. तसंच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर परिस्थिती जैसे थे करता आली असती असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
अजित पवार म्हणाले की, प्रतोद नेमण्यापासून अनेक गोष्टींना सर्वोच्च न्यायालयाने चुकीचं म्हटलं. मात्र, पुढे काय झालं? यामध्ये एक तर आमचे त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला. तो राजीनामा त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता देण्यात आला. राजीनामा दिल्यावर माहिती देण्यात आली. एक तर तो राजीनामा द्यायला नको होता. राजीनामा दिल्यानंतर लगेच पुन्हा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊन तो विषय संपवायला हवा होता. तेही दुर्दैवाने आमच्या सगळ्यांकडून झालं नाही.
मी यासाठी एकट्याला दोषी धरत नाही. आमच्या महाविकास आघाडीकडून तो विषय तातडीने धसास लागला असता तर तिथं विधानसभा अध्यक्ष बसले असते आणि त्यांच्या अधिपत्याखाली या सर्व गोष्टी झाल्या असत्या. मोठा काळ विधानसभेचे उपाध्यक्ष काम पाहत होते. अध्यक्षांची जागा रिक्त राहिली होती, असं अजित पवार म्हणाले.
या घटना घडल्यानंतर शिंदे-फडणवीसांनी पहिल्यांदा बहुमताच्या जोरावर ती जागा भरली. जर त्या जागेवर मविआचे नेते असते तर त्यांनी या १६ आमदारांना तेव्हाच अपात्र ठरवलं असतं, असंही अजित पवार म्हणाले.