मुंबई: बहुचर्चित आणि वादाच्या भोवऱ्यात सापडलेला रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. एका प्रश्नावर लेखी उत्तर देतांना त्यांनी ही माहिती दिली. सौदी अरेबियाची अरमाको, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या सहभागातून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाला नाणारसह कोकणातील जनतेचा विरोध होता. शिवसेनेने देखील याला सातत्याने विरोध केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात नाणार, सागवे, कात्रादेवी परिसरांत जगातील सर्वात मोठी रिफायनरी म्हणजे खनिज तेल शुद्धीकरणाचा तीन लाख कोटींचा हा भव्य प्रकल्प येऊ घातला होता. ह्या प्रकल्पांसाठी १६००० एकर जमीन संपादित केली जाणार होती. पण नाणारमधून हटवून ही रिफायनरी आता रायगड जिल्ह्यात येणार आहे. विधिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. रायगडमध्ये प्रकल्प आणण्यास स्थानिकांचा विरोध नाही. ४० गावांमधील ग्रामस्थांचा भूसंपादनालाविरोध नाही, अस मुख्यमंत्री उत्तरात म्हटलं आहे.
प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्प आता अधिकृतपणे ‘रद्द’ झाला आशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीत लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. तसेच नाणारवासियांना हा प्रकल्प रद्द झाल्याच्या राजपत्राची लेखी प्रतच उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिली होती.