जन्मठेपेच्या शिक्षेत फरार नांदुर्‍याच्या संशयितास जळगावातून अटक

0

पत्नीचा जाळून केला होता खून ; पॅरोल रजेवर बाहेर पडून 2012 पासून होता फरार ; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

जळगाव- पत्नीच्या अंगावर रॉकेत ओतून तिला जाळून देत तिचा खून केल्याप्रकरणी पती निवृत्ती दगडू बगेवार याच्या विरोधात नांदुरा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल असून त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. शिक्षा भोगत असतांना पॅरोल बाहेर पडून फरार झालेल्या निवृत्ती बगेवार याला मंगळवारी जळगावातील हनुमाननगर येथून अटक करण्यात आली आहे. तो मूळ नाव बदलून 2013 पासून संजय बोरसे या नावाने भाडेकरारावर खोली करुन शहरात वास्तव्य करत असल्याची माहिती समोर आली आहे. कुठलीही ओळख नसतांना खूनासारखा गंभीर गुन्हा आणि त्यात पुन्हा जन्मठेपेची शिक्षा होवून फरार संशयितास अटक करुन एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.

बुलढाणा जिल्हयातील दिघी येथील निवृत्ती दगडू बगेवार (बेलदार) याने 2007 मध्ये संतापाच्या भरात पत्नी सुरेखा हिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळून खून केला होता. याप्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात निवृत्ती विरोधात गुरन 3063/2013 भादवि कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अटक करुन न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले. गुन्ह्यात न्यायालयाने त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षा भोगत असताना संशयित निवृत्ती हा 2012 मध्ये पॅरोल रजेवर बाहेर पडला. पुन्हा कारागृहात न येता फरार झाला. त्यामुळे त्याच्याविरोधात भादवि कलम 224 प्रमाणे पुन्हा गुन्हा दाखल झाला होता.

तब्बल सहा वर्षानंतर जळगावातून ताब्यात
फरार झाल्यापासून नांदुरा पोलीस त्याच्या शोधात होती. बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांना निवृत्ती हा जळगावात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल सरीका वाकोडे, पोलीस नाईक रघुनाथ जाधव, नदीम शेख, श्रीकांत चिंचोले या पथकाने जळगाव गाठले. एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तेथील निरिक्षकांना प्रकार कळविला. पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांनी बुलढाण्याच्या पथकासह एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील, हेमंत कळसकर यांना रवाना केले. पथकाने दिवसभर शहरातील सुप्रिम कॉलनी, गेंदालाल मिल, अशा सर्व ठिकाणी शोध घेतला मात्र मिळून आला नाही. सायंकराळी रामकृष्ण पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत निवृत्ती हा नाव बदलून भाड्याच्या खोलीत हनमुाननगर येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने रात्री 8 वाजेच्या सुमारास सापळा रचून निवृत्तीला ताब्यात घेतले. नाव बदलून तो भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होता. तसेच बांधकामच्या साईटवर मजुरी करुन तो उदरनिर्वाह करत असल्याची माहिती मिळाली आहे.