नाशिक स्मार्ट सिटीला मिळाला ‘इकोनॉमिक्स टाईम्स गर्व्हमेंट डिजिटेक’ पुरस्कार

नाशिक, विशेष प्रतिनिधी,

इकोनॉमिक्स टाईम्स गर्व्हमेंट डिजिटेकने हॉटेल ग्रँड हयात गोवा येथे आयोजित केलेल्या चौथ्या डिजिटेक कॉन्क्लेव्ह कार्यक्रमामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडला देशात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. ‘महानगरपालिकेच्या शाळांचे डिजिटल सोल्युशन्स असलेल्या स्मार्ट शाळांमध्ये रूपांतर’ या प्रकारात रौप्य पदक देऊन गौरवण्यात आले.

नाशिक स्मार्ट सिटीच्या स्मार्ट स्कूल या प्रकल्पाला हा पुरस्कार प्राप्त झाला. नाशिक महानगरपालिकेच्या ६९ शाळांना स्मार्ट स्कूल बनवण्याचे कार्य नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुरु आहे. डिजिटल सोल्युशन्स चा वापर करून महानगरपालिकेच्या शाळांचा स्मार्ट स्कुल मध्ये यशस्वी कायापालट केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

या पुरस्कारासाठी सर्व सरकारी, PSU, १०० स्मार्ट सिटी, केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद सरकारी कार्यालयांकडून एकूण ३७६ प्रकल्पांची नामांकने प्राप्त झाली होती. पहिल्या स्तरावरील पडताळणी दरम्यान ३७६ नामांकनांपैकी १०७ नामांकनांची निवड, विविध क्षेत्रातील IAS अधिकारी आणि प्राध्यापक समाविष्ट असलेल्या उच्च दर्जाच्या परिक्षकांद्वारे करण्यात आली. अंतिम पडताळणीमध्ये गोल्ड आणि सिल्व्हर अंतर्गत १५ श्रेणींमध्ये ३० आणि अधिक ५ विशेष गट श्रेणी नामांकनांची निवड करण्यात आली होती. यात संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ नाशिक व मुंबई यांना पुरस्कार जाहीर झाला. यामध्ये नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा समावेश होता. ‘डिजिटल सोल्युशन्स वापरून नाशिक महानगरपालिका शाळांचे स्मार्ट शाळांमध्ये रूपांतर’ हा प्रकल्प सिल्व्हर श्रेणी मध्ये निवडला गेला.

या पुरस्काराचे वितरण मोहम्मद इस्राईल मन्सुरी (माहिती तंत्रज्ञान मंत्री, बिहार), प्रकाश साव्हानी (सचिव इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय), डॉ.समीर शर्मा (मुख्य कार्यकारी अधिकारी व माजी सचिव,आंध्र प्रदेश), सुबोध अग्रवाल (अतिरिक्त मुख्य सचिव PHED आणि जलसंसाधन राजस्थान सरकार) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाशिक स्मार्ट सिटी च्या वतीने सदर पुरस्कार माहिती व तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख अनिल तडकोड, नाशिक महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी बापूसाहेब पाटील तसेच पॅलेडियम कंपनीचे सल्लागार अंशुमन कुमार यांनी स्विकारला.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ.अशोक करंजकर, नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी स्मार्ट स्कूल प्रकल्पासंबंधित अधिकारी व कमर्चारी वर्गाचे अभिनंदन केले.