‘राष्ट्रवादी काँग्रेसचा केजरीवालांना पूर्णपणे पाठिंबा’; शरद पवार

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली सरकारच्या अधिकारांच्या मुद्यावर राष्ट्रवादीचा केजरीवाल सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचं शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, आजची पत्रकार परिषद महत्वाची आहे. देशासमोर एक नवा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न केवळ दिल्लीचा नाही, तर संसदीय लोकशाहीच्या संरक्षणाचा प्रश्न आहे. दिल्लीत थेट संसदीय लोकशाहीवर आघात होत आहे. लोकशाहीत निवडून आलेलं सरकार निर्णय घेते. नियुक्त केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वापर करून लोकनियुक्त सरकारकडे दुर्लक्ष केलं जात आहे. हा प्रश्न सर्वांसमोर आहे. त्यामुळे हा मुद्दा लोकशाही वाचवण्याचा आहे.

आज दिल्लीत कोणतं सरकार आहे यावर भांडण्याची वेळ नाही. आज लोकशाही वाचवण्याची वेळ आहे. सामान्य लोकांचं मत घेऊन आपलं सरकार स्थापन करण्याचा अधिकार वाचवण्यासाठी आज अरविंद केजरीवाल, भगवंत मान या ठिकाणी आले आहेत. त्या मुद्यावर त्यांनी पाठिंबा मागितला आहे. माझ्यासह माझा पक्ष आणि महाराष्ट्राची जनता याला नक्कीच पाठिंबा देईल, असं शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वत: पूर्ण मदत करेनच, याशिवाय देशभरातील इतर नेत्यांचाही पाठिंबा मिळवण्यासाठई प्रयत्न करेल. मला संसदेत येऊन सलग ५६ वर्षे झाली आहेत. त्यामुळे याचा एक फायदा होतो तो म्हणजे देशातील कोणत्याही राज्यात गेलं तरी तिथे कोणताही नेता किंवा खासदार यांच्याशी व्यक्तिगत संबंध आहेत. अनेकांबरोबर मी काम केलं आहे. हा प्रश्न दिल्लीचा किंवा आप पक्षाचा नाही. हा प्रश्न या देशात लोकनियुक्त सरकारला दिलेला निर्णय घेण्याचा अधिकार वाचवण्याचा आहे. राष्ट्रवादी स्वत: पाठिंबा तर देईलच, पण इतर राज्यात जाऊन इतर नेत्यांना-पक्षांना या मुद्याला पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न करू, असंही शरद पवार म्हणाले.