‘राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कारा’ने अॅड. जगदीश कुवर सन्मानित

शहादा प्रतिनिधी ।

अखिल भारतीय धोबी महासंघाच्यावतीने येथील अॅड. जगदीश पितांबर कुवर यांना मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक शनिवारी ६ मे रोजी रोहे (जि. रायगड) येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार कनोजिया, राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, राजेंद्र आहेर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी शहाद्याचे माजी शिक्षण सभापती लोटनराव धोबी, संतोष वाल्हे, विठ्ठल बच्छाव आदींची प्रमुख उपस्थिती होती. मूळचे निमगुळ (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील रहिवाशी अॅड. जगदीश पितांबर कुवर हे वकीली क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी आजतागायत न्यायदानाच्या क्षेत्रातून सामाजिक बांधिलकी जपत अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. ते विविध जनहितार्थ उपक्रम राबवित सामाजिक कार्यात सतत सहभागी झाले आहेत.