पाकिस्तानात जाण्यासाठी मला सुषमा स्वराज यांनी परवानगी दिली-नवज्योतसिंग सिद्धू

0

नवी दिल्ली-पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीप्रसंगी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची सिद्धू यांनी गळाभेट घेतली. यावरून नवज्योतसिंग सिद्धूवर सर्वत्रटीका केली जात आहे. दरम्यान सिद्धूने आपण पाकिस्तानला का गेलो याचे स्पष्टीकरण दिले आहे.

इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला येण्याबाबत मला दहा वेळा आमंत्रण देण्यात आले. मग मी भारत सरकारकडे परवानगी मागितली. जी मला मिळाली नाही मग मी वाट बघत बसलो. पाकिस्तान सरकारने व्हिसा दिल्यानंतर सुषमा स्वराज यांनी स्वत: मला रात्री फोन केला व परवानगी देण्यात येत असल्याचे सांगितले,” असे सिद्धू यांनी म्हटले आहे.

एका वकिलानं तर याप्रकरणी सिद्धू यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला आहे. याबाबत आपली बाजू मांडताना सिद्धू यांनी सांगितलं की बाजवा यांनी आपल्याशी संवाद साधला. पाकिस्तानमधील गुरूनानक गुरुद्वाराला ५५० वर्षे पूर्ण होत असल्याने करतारपूर मार्ग खुला करणार असल्याचे बाजवा यांनी आपल्याला सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी मान्य झाल्याने आपण उत्साहाने बाजवा यांची गळाभेट घेतली, असे सिद्धू म्हणाले आहेत.