जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणला भावी डॉक्टरांचा मृतदेह

0

मुंबईला नायर रुग्णालयाच्या वसतीगृहात केली होती आत्महत्या ; रँगिंग करणार्‍या तिघांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ; कार्यालयात प्रवेश न दिल्याने रस्त्यावरच ठेवला जमावाने मृतदेह

जळगाव : वरिष्ठ तीन डॉक्टरांच्या छळाला कंटाळून डॉ.पायल सलीम तडवी (30, रा.साई संस्कार कॉलनी, वाघ नगर, जळगाव) या विवाहितेने मुंबईत बुधवारी रात्री साडे नऊ वाजता वसतीगृहातच गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या मृत्यूस कारणीभूत रँगीग करणार्‍या तीन महिला विद्यार्थीनी डॉक्टरांना तत्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी नातेवाईकांसह समाजा बांधवांनी शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता पायलचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. समाजबांधवांतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

मुंबई येथील नायर रुग्णालय आणि वैद्यकिय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या स्त्री रोग विभागात दुसर्‍या वर्षात (एम.डी)शिक्षण घेत असलेल्या डॉ.पायल सलीम तडवी यांना सिनियर असलेल्या सहकारी डॉ.हेमा आहुजा, डॉ.भक्ती महिरे व डॉ.अंकिता खंडेलवाल या तिघांकडून मानसिक त्रास व अपमानित केले जात होते. अधीष्ठाता व व्याख्याता यांच्याकडे तक्रार करुनही त्याची दखल न घेतल्याने डॉ.पायल यांनी बुधवारी रात्री साडे नऊ वाजता वसतीगृहातच गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी गुरुवारी रॅगिंग करणार्‍या तिन्ही महिला डॉक्टरांविरुध्द या आग्रीपाडा (भायखळा) पोलीस ठाण्यात रॅगिंग, आत्महत्येस प्रवृत्त करणे व अट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोषींना अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी पायलचा मृतदेह नातेवाईकांनी थेटजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणला. व मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांना दिले. त्यांनी कार्यवाहीचे आश्‍वासन दिल्यानंतर मृतदेह परत नेण्यात आला.

प्रवेश करु न दिल्याने भररस्त्यात ठेवला मृतदेह
डॉ.पायल यांना आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या डॉ.हेमा आहुजा, डॉ.भक्ती महिरे व डॉ.अंकिता खंडेलवाल या तिघांना तत्काळ अटक करावी, भविष्यात कोणत्याही विद्यार्थिनीची रॅगिंग होऊ नये यासाठी आदीवासी तडवी भिल युवा कृती समिती व नातेवाईकांनी शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता डॉ.पायल यांचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर आणला.पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करुन बाहेरच मृतदेह रोखला. संतप्त नातेवाईकांनी डॉ.पायल यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांना फाशीची शिक्षा द्यावी, त्यांना आताच अटक करावी अशा घोषणा दिल्या. घोषणाबाजी करत भररस्त्यात मृतदेह ठेवला. दोनशेच्यावर लोकांचा जमाव व रस्त्यावरच मृतदेह यामुळे दोन्ही बाजूने वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांची चांगलीच कोंडी झाली.

मी कॅन्सर पेशंट, मला न्याय मिळवून द्या
जमाव आक्रमक होत असल्याने प्रशासनातर्फे पायलचे वडील, आई नातेवाईकांसह काही जणांना निवेदन देण्यासाठी प्रवेश देण्यात आला. यावेळी डॉ. पायल यांच्या आई यांनी मी कॅन्सर पेशंट आहे, साहेब मला न्याय मिळवू द्या, कृपया करुन त्रास देणार्‍यांना अटक करा, असे मागणी करत हंबरडा फोडला.यानंतर शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवासी उपजिल्हधिकार्‍यांना निवेदन सादर केले. निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करुन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आश्‍वासन नातेवाईक तसेच समाजबांधवांना दिले. 24 तासात दोषींना अटक न झाल्यास जिल्हाभरातील तडवी एकत्र होवून रस्त्यावर उतरेल, यानंतर होणार्‍या परिणामास शासन जबाबदार राहिल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

काय होता पायल ला सिनियर डॉक्टरकडून त्रास
डॉ. पायल सलमान तडवी ह्या 1 मे 2018 पासून मुंबईतील नायर हॉस्पिटला येथे स्त्री रोग तज्ञ पदाचे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना तिचे सिनियर डॉक्टर डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी संगनमताने तिला शुल्लक कारणावरुन काही तरी निमित्त शोधून टॉर्चर करीत, पेशंट समोर मोठ्या मोठ्याने ओरडून पायल हिला रागवित, पेशंत समोर पायल हिला अपमानित करुन तिची मानसिकता खराब करत, तसेच सिनियर डॉक्टर या तिला ऑपरेशन थिएटरमध्ये पाय देवून नाही, तिला शिकू देणार नाही, खोटे नाटे कारणे सांगून तिची तक्रार रुग्णालयाचे एचओडी, लेक्चरर यांना तसेच डिन सरांना करुन अशी वारंवार धमकी देत होत्या. तसेच प्रॅक्टीस सरळ मार्गान होवू देणार नाही, अशी धमकी देवून त्यांच्या रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या हॉटस्अ‍ॅप गृपवर वाईट वाटेल अशा पोस्ट टाकत. तसेच आदिवसी तडवी भिल्ल समाजाच्या आरक्षीत जागेवर निवड झाली असल्याने तिचा शारिरीक व मानसिक छळ करुन डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई व्हावी, असा जबाब पायलची आई आबेदा सलीम तडवी यांना मुंबई येथील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात दिला आहे.

मृतदेहाची विटंबना करणार्‍या 300 जणांविरोधात गुन्हा
मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संशयितांना अटक करावी या मागणीसाठी तिच्या नातेवाईकासह समाजबांधवांनी शुक्रवारी जिल्हा कार्यालयासमोर मयत तरुणीचा मृतदेह आणला होता. आदिवासी तडवी भिल युवा कृती समिती बहुद्देशीय संस्थेच्या नेतृत्वात समाज बांधव तसेच नातेवाईकांनी आंदोलन केले होते. विना परवानगी आंदोलन तसेच मृतदेहाची विटंबना व गैरकायद्याची मंडळी जमविल्याने व रास्तारोको केल्याने आदिवासी तडवी भिल युवा कृती समितीच्या अध्यक्ष, सदस्यासह 200 ते 300 जणांविरोधात जिल्हापेठ पोलिसात पोलीस कर्मचारी केतन सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तरुणीच्या नातेवाईक पोलीस उपनिरिक्षकाचाही समावेश आहे.