काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सर्व निवडणुका एकत्र लढविणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची माहिती
गोंदिया : पालघर व भंडारा-गोंदिया या दोन लोकसभा पोटनिवडणुकांसह आगामी सर्व निवडणुका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. 2014मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षाचे उमेदवार होते तोच पक्ष यंदाच्या पोटनिवडणुकीतही आपला उमेदवार देणार असल्याचेही पटेल यांनी सांगितले. त्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पटेल हेच उमेदवार असतील व भाजपसोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांचा पत्ता कट झाला असल्याचेही स्पष्ट झाले आहे. येत्या 9 मेरोजी दोन्ही पक्ष पोटनिवडणुकांतील उमेदवारांची घोषणा करतील, असेही पटेल यांनी सांगितले. तसेच, यापुढील काळात भाजप-शिवसेना सरकारच्या नाकर्ते धोरणाविरोधात असलेला जनअसंतोष पाहाता मोर्चे काढण्याच्या सूचनाही वरिष्ठांनी दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
पटेल-पटोले यांच्यातील वाद मिटला!
गोंदिया येथे शनिवारी पत्रकार परिषद घेऊन प्रफुल्ल पटेल यांनी आघाडीच्या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, सद्या भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहे. काही वेळापूर्वीच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली होती. त्या भेटीत हीच निवडणूक नव्हे तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढावे, अशी चर्चा दोन्ही नेत्यांत झाली. येत्या दोन दिवसांत यावर शिक्कामोर्तब होईल, असेही पटेल यांनी सांगितले. गोंदिया-भंडारा निवडणुकीविषयी पटेल म्हणाले, की नाना पटोले हे माझ्या लहान भावासारखे आहे. त्यामुळे आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. येत्या काळात आम्ही सोबत काम करू. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार असेल. याबाबत 9 मेरोजी निर्णय जाहीर करण्यात येईल. पटेल यांच्या घोषणेवर पटोले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले, प्रफुल्ल पटेल व माझ्यातील वाद आता संपला आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघ भाजपमुक्त करायचा यावर आमचे एकमत झाले आहे. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लढवतील. याबाबत दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील तो निर्णय आम्हा दोघांनाही मान्य असेल, असे पटोले यांनी सांगितले.
आघाडीसाठी शरद पवारांनीच घेतला पुढाकार
मागील विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढविल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी आघाडी केली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने पवारांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यानुसार, शनिवारी झालेल्या बैठकीत आघाडीचा निर्णय या दोन्हीही नेत्यांनी घेतला आहे. 1999 साली तत्कालिन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशा वंशाचा मुद्दा उपस्थित करत शरद पवार, पी. ए. संगमा, तारिक अन्वर यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. 1999 च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात सत्तेसाठी एकत्र आले होते. पवार हे 2014साली डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्रीही झाले होते. 2014च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत ही आघाडी कायम होती. मात्र, 2014ची विधानसभा निवडणूक या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढविली होती. नुकतीच विधानपरिषद निवडणूकही या आघाडीने एकत्र लढविली होती. दोन्ही पक्षांनी 50-50चा फॉर्म्युला मान्य केला होता.