आठ दिवसात राष्ट्रवादीचे उमेदवार ठरणार

0

निरीक्षक करण खलाटे यांची जिल्हा बैठकीत माहिती

जळगाव – राज्यस्तरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपाची चर्चा आता अंतीम टप्प्यात आली आहे. ११० जागांसाठी उमेदवार निश्‍चीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार मतदारसंघांचा सर्वे देखिल करण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर केले जातील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक करण खलाटे यांनी आज जिल्हा बैठकीत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक आज माजी आ. अरूणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, आ. डॉ. सतीश पाटील, माजी खा. वसंतराव मोरे, माजी आ. दिलीप वाघ, माजी आ. जगदीश वळवी, माजी आ. संतोष चौधरी, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, अनिल पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, मंगला पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील, विजया पाटील, मिनल पाटील, कल्पीता पाटील, अरविंद मानकरी, युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, शहराध्यक्ष अभिषेक पाटील, विलास पाटील, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


भाजपाचा विजय संशयास्पद
जिल्हा बैठकीत बोलतांना निरीक्षक करण खलाटे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील स्वाभीमानी जनता सत्ताधार्‍यांचा माज उतरविल्याशिवाय राहणार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपा विजय हा संशयास्पद आहे. विधानसभेची निवडणूक ही आपल्या अस्तीत्वाची लढाई आहे. अधिकृत घोेषणा होत नाही तोपर्यंत इच्छुक उमेदवारांनी जनतेपर्यंत पोहोचायचे आहे. राज्यकर्ते ताकदवान असले तरी आपली लढाई ही विचारांची लढाई आहे. जोपर्यंत शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य माणून सोबत आहे तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस कायम राहील. त्यासाठी आधी आपल्या घरातील भांडणे घरातच मिटवावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.


आपसातील हेवेदावे दूर करा – संजय गरूड
जामनेर मतदारसंघात मोठ्या शक्तीशी लढाई लढायची आहे. मात्र त्यासाठी आधी आपापसातील हेवेदावे दूर करावे असे माजी जिल्हा परीषद सदस्य संजय गरूड यांनी सांगितले.


इव्हीएमवर ओरडण्यापेक्षा बुथ मजबूत करा – अनिल पाटील
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपण इव्हीएमबाबतच ओरडत सुटलो. पण प्रत्यक्षात आपण स्वत: किती मतदान बाहेर काढले हे मनाला विचारा. निवडणुका जिंकायच्या असतील तर बुथ रचना मजबुत हवी. संघटन आणि बुथ रचना मजबुत करण्याचे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक अनिल पाटील यांनी केले.


जिल्हा पवारांच्या पाठीशी – कल्पना पाटील
जळगाव जिल्ह्याला खा. शरद पवार यांनी भरभरून दिले आहे. त्यामुळे संकटकाळात जळगाव जिल्हा हा नेहमीच खा. पवार साहेबांच्या पाठीशी असल्याचे महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांनी सांगितले. तसेच यावेळेला विधानसभा निवडणुकीत महिला उमेदवारांना संधी द्यावी अशी मागणीही त्यांनी बैठकीत केली. यावेळी माजी खा. वसंतराव मोरे, रमेश पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.


विशाल देवकरांना उमेदवारी द्यावी – वाघमारे
जळगाव ग्रामीण मतदारसंघातुन ज्या आठ इच्छुक उमेदवारांनी मागितली आहे त्यांना आपला विरोध नाही. मात्र या मतदारसंघात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा संपर्क दांडगा आहे. मात्र ते सध्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकले असल्याने त्यांचे पुत्र विशाल देवकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी धरणगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक दिपक वाघमारे यांनी बैठकीत केली.


स्व. अविनाश पवारांना आर्थिक मदत
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्व. अविनाश पवार यांच्या कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना आधाराची गरज असुन पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने आर्थिक मदत करावी असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी केले. यावेळी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी २५ हजार, माजी खा. वसंतराव मोरे यांनी ११ हजार रूपयांची रोख मदत केली.