जिल्हा बैठकीत अॅड. रवींद्र पाटील यांचे तालुकाध्यक्षांना आदेश
जळगाव- विधानसभा निवडणूकीवेळी ज्यांनी पक्ष सोडला आणि ज्यांनी पक्षाच्या उमेदवारा विरोधात काम केले आहे अशा पदाधिकारी व कार्यकत्यांची नावे व माहिती असा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी आज जिल्हा बैठकीत तालुकाध्यक्षांना दिले. दरम्यान दि. १२ डिसेंबर रोजी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांचा वाढदिवस असुन त्यानिमीत्ताने जिल्ह्यातुन दोन लाख रूपयांचा निधी वेल्फेअर ट्रस्टकडे जमा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.
विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक आज विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष कार्यालयात पार पडली. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षविरोधी काम करणारे आणि पक्षांतर करणार्यांची माहिती मागविली आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, अल्पसंख्यांकचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलीक, जिल्हा समन्वयक विकास पवार, माजी आ. दिलीप वाघ, महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, युवकचे अध्यक्ष अभिषेक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, मंगला पाटील, महिला शहराध्यक्षा ममता सोनवणे, जगन सोनवणे, उमेश नेमाडे, विलास पाटील, डॉ. चोपडे, योगेश देसले, सोपान पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी निवडणूकांसाठी शिवसेनेशी चर्चा
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी झाली असुन जिल्ह्यात देखिल आगामी काळात होणार्या जिल्हा बँक, दुध संघ यासह विविध निवडणुका एकत्रितपणे लढविण्यासंदर्भात शिवसेनेचे उपनेते आ. गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा परिषदेत सत्ता कशी येईल याविषयी चर्चा झाली आहे. दि. १२ डिसेंबर रोजी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमीत्ताने पक्षाच्या वेल्फेअर ट्रस्टकडे दोन लाख रूपयांचा निधी गोळा करावयाचा आहे. प्रत्येक तालुक्याने किमान १५ ते २० हजार रूपये निधी गोळा करून तो दि. ९ डिसेंबरपर्यंत जिल्हा कार्यालयाकडे सोपवावा अशा सुचनाही जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी केल्या. तसेच शेतकर्यांचे सरसकट कर्ज माफ करावे अशी मागणीही त्यांनी बैठकीत केली. बैठकीत माजी आ. अरूणभाई गुजराथी यांच्यासह तालुकाध्यक्षांनी मनोगत व्यक्त केले.