पुणे: गोंदिया-भंडाऱ्याच्या लोकसभा जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वादाची मोठी ठिणगी पडण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे पोटनिवडणुकीसाठी गोंदियाच्या जागेवर दावा केला आहे. 2014 ची लोकसभा निवडणूक लढवून नाना पटोले सत्तेवर आले. पटोलेंनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला. मात्र भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नाना पटोले पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस ही जागा सोडण्यास तयार होणार नाही.
दुसरीकडे पटोलेंच्या आधी राष्ट्रवादीचे माजी खासदार प्रफुल्ल पटेल सलग 3 वेळा गोंदिया-भंडाऱ्यातून निवडून आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीही सहजासहजी ही जागा सोडणार नाही. त्यामुळे ही जागा नेमकं कोण लढवणार आणि कोणाविरोधात लढवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 28 मे रोजी गोंदिया-भंडारा आणि पालघरची पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसनं तूर्तास सावध पवित्रा घेतला आहे.