अखेर सचिन अहिरे शिवबंधनात अडकले !

0

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर हे गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. दरम्यान आज अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना वाढवण्याचे काम मी करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी पक्ष प्रवेशानंतर दिली.

आदित्य ठाकरेंच्या कामाने मी प्रभावित झाल्याचे ही ते म्हणाले आहेत. कोणत्या जागेवरून कोणाला लढवले पाहिजे हा निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्थान माझ्या हृदयात कायम आहे. पण यापलीकडे जाऊन काही निर्णय घ्यावे लागतात, असे शिवसेनेत प्रवेश करण्याआधी सचिन अहिर यांनी सांगितले होते. तसेच राजकारणात कधीतरी काही निर्णय घ्यावे लागतात, ते चूक की बरोबर सांगता येत नाही. राष्ट्रवादी सोडताना फार आनंदी नाही, पण काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात. उद्धव ठाकरे, बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न साकार करण्याची संधी मिळत असेल तर नक्कीच आनंद आहे, असे सचिन अहिर म्हणाले आहेत.