वशीकरण मंत्राद्वारे ना. महाजनांची मुख्यमंत्र्यांवर मोहिनी

0

राष्ट्रवादीचे आमदार डॉ.सतीश पाटील यांचा अजब दावा

जळगाव- जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्यातील संतांकडून वशिकरण मंत्र घेतला आहे. या मंत्रानेच त्यांनी मुख्यमंत्र्यांना वश केले असून ते सांगतील तेवढेच मुख्यमंत्री बोलतात, असा अजब दावा राष्ट्रवादीचे आ.डॉ.सतीश पाटील यांना आज केला. मात्र आपल्याकडेही असा मंत्र आहे. गिरीश महाजनांना यावेळी पाडल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या जिल्हा बैठकीत बोलतांना आमदार डॉ. सतीश पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील एक नेता रोज राष्ट्रवादीला डिवचतोय. त्याला हरविणे हे आपले पहिले लक्ष्य राहणार असून गिरीश महाजनांना यावेळी पाडल्याशिवाय राहणार नाही असे डॉ. पाटील यांनी जिल्हा बैठकीत जाहीर केले. राज्यात सध्या पडझड सुरू आहे. रोज कुठला तरी नेता जातो आणि कार्यकर्ते सुन्न होतात. ३७ दिवसांनी विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. भाजपावाले सांगतात त्याप्रमाणे दि. १३ रोजी आचारसंहीता जाहीर होण्याची शक्यता आहे. कोण कुठून लढेल हे पार्लमेंटरी बोर्ड ठरविणार आहे. पक्षात आजही झारीतले शुक्राचार्य आहेत. स्वत:चं घर शाबूत ठेवण्यासाठी सगळ्यांना एक व्हावे लागणार असल्याचे आ. डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले.


घरकुलच्या निकालाची पवारांनी घेतली माहिती
ज्यादिवशी घरकुल घोटाळ्याचा निकाल लागला त्यादिवशी खा. शरद पवार यांचा फोन आला. त्यांनी आपल्याला विचारले की, घरकुलच्या निकालात आपले किती लोक आहेत. मात्र हे प्रकरण ज्यावेळी झाले त्यावेळी खान्देश विकास आघाडी होती. त्यामुळे पक्षाच्यादृष्टीने यात केवळ आपले गुलाबराव देवकर हे असून त्यांची भूमिका केवळ स्वाक्षरीपुरताच राहील्याची माहिती खा. शरद पवार यांना आपण दिल्याचे आ. डॉ. सतीश पाटील यांनी बैठकीत सांगितले.


मुक्ताईनगरातुन रवींद्रभैय्यांची माघार
मुक्ताईनगर मतदारसंघातुन माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे हे सहा वेळा निवडून आले आहे. त्यांच्याविरूध्द जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी अनेकदा उमेदवारी केली. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे यावेळी आपण निवडणूक लढविणार नसल्याचे अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी जिल्हा बैठकीत सांगितले. तसेच या मतदारसंघातून पक्षातर्फे पाच जण इच्छूक आहेत. ज्यांना कोणाला उमेदवारी मिळेल त्यांच्या पाठीशी आपण ताकदीने उभे राहू अशी ग्वाही अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी दिली.