बीड- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीबाबत उस्मानाबाद लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात घोषणा झालेली नाही. मात्र असे असतांना भाजपातून आलेले ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे मानस बंधू रमेश कराड यांनी राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आघाडीबाबत निर्णय होण्याअगोदरच राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने कॉंग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे कॉंग्रेसने देखील आपला उमेदवार निश्चित केला आहे.
दरम्यान भाजपतर्फे आज राष्ट्रवादीतून निलंबित करण्यात आलेले माजी मंत्री सुरेश धस हे भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर कॉंग्रेसतर्फे अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजशेखर मोदी हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मात्र आज सकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीचा समन्वय झाला. त्यानुसार लातूरची जागा राष्ट्रवादीला, तर परभणीचा जागा काँग्रेसला देण्यावर एकमत झाले आहे.
सुरेश धस यांची उमेदवारी दाखल झाल्यानंतर भाजपचे मंत्री पंकजा मुंडे आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत भाजपचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला तीनही जिल्ह्यातील भाजपचे आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत. इथून पुढे भाजपाबरोबर युती न करण्याचा जाहीर करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मात्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपबरोबरच युती केली आहे. सेनेची बदनामी होऊ नये म्हणून युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरी शिवसेना तीन आणि भाजप तीन जागांवर निवडणूक लढवत आहे.
पक्षनिहाय मतदार
भाजप २८८
राष्ट्रवादी २७९
काँग्रेस १८०
शिवसेना ६१
अपक्ष ९४