पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेस माजी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाविषयीची आपली निष्ठा बोलून दाखवली. तटकरे म्हणाले की, पक्ष सोडण्याचा साधा विचार जरी मनात आला तरी विष घेऊन आत्महत्या करेन या शब्दात त्यांनी राष्ट्रवादीबद्दल असलेली एक निष्ठता दाखविली आहे.
पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणी सभेत जयंत पाटील यांची प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी पक्षाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यकारीणी सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. ते पुढे म्हणाले, पक्षाने मला चांगली साथ दिली, शरद पवार आणि अजित पवार यांनी वेळोवेळी संधी दिली. शरद पवार यांच्यामुळेच महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष होऊ शकलो. माझ्या आजवरच्या कारकिर्दीबद्दल मी समाधानी असल्याचे सांगत यापुढे पक्षाचा निष्ठावान सैनिक म्हणून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.