पर्यायी सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी विचार करेल : नवाब मलिक

0

मुंबई: गेल्या १५ दिवसापासून विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून, सत्ता स्थापन झाली नाही. भाजपा, शिवसेना महायुतीला बहुमत असून, मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना अडून बसली आहे. यामुळे राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. दरम्यान शनिवारी राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने सत्तास्थापन केल्यास त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागेल व मतदानावेळी आम्ही भाजप सरकारविरोधात मतदान करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच महाराष्ट्राच्या हितासाठी पर्यायी सरकार कशाप्रकारे देता येईल, यावर आम्ही निश्चितच विचार करू, असे मलिक यांनी नमूद केले.

मलिक यांनी शिवसेनेबाबतही महत्त्वपूर्ण केले आहे. भाजप सरकार पाडण्यासाठी शिवसेना भाजप विरोधात मतदान करणार आहे का? हे आम्हाला पाहायचे आहे. तसे झालेच तर नंतर पर्यायी सरकार कसे देता येईल, याचा विचार राष्ट्रवादी करेल, असे मलिक यांनी स्पष्ट केले. भाजपकडे बहुमताचा आकडा आहे की नाही, याची राज्यपालांनी खात्री करून घ्यायला हवी नाहीतर सत्तेसाठी आमदारांचा घोडेबाजार मांडला जाण्याची भीती आहे, असेही मलिक यांनी पुढे नमूद केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक १२ नोव्हेंबर रोजी बोलावण्यात आली आहे. या बैठकीला पक्षाध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत, असेही मलिक यांनी सांगितले. भाजपने सत्तास्थापन केल्यास देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे बहुमत सिद्ध करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. २८८ सदस्यसंख्या असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत १४५ हा बहुमताचा जादुई आकडा असून भाजपकडे १०५ आमदारांचे बळ आहे. निकालांनंतर काही अपक्ष आमदार व छोट्या पक्षांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांना धरूनही भाजपचं संख्याबळ जेमतेम १२०च्या आसपास जात आहे. अशा स्थितीत बहुमताचा आकडा फारच दूर राहणार आहे. त्यामुळे सत्तेचं गणित अधिकच रंगतदार होणार असल्याचेच संकेत मिळत आहेत.