नीट परीक्षेला बसताना कापल्या कॉलर

0

पुणे । वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट या सामाईक परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर आलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी ड्रेस कोडचे नियम धाब्यावर बसवल्याने त्यांच्या कॉलर कापण्यात आल्याची घटना पुण्यात घडली. कॉलर असलेले शर्ट घालून येण्यास मनाई केलेली असतानाही अनेक विद्यार्थी कॉलर असलेले शर्ट घालून परीक्षेसाठी आले. त्यामुळे परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांच्या शर्टच्या कॉलर कापण्यात आल्या आणि त्यानंतरच त्यांना परीक्षेला बसू देण्यात आले.

रविवारी देशभरात नीटच्या परीक्षा घेण्यात आल्या. नीटसाठी या आधीच ड्रेस कोड लागू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना त्याची माहितीही देण्यात आली होती. कॉलर नसलेले शर्ट घालून येण्यापासून ते सोबत पेन न आणण्याच्या सूचनाही विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. तरीही अनेक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी ड्रेस कोडचे पालन न केल्याचे दिसून आले आहे. पुण्यातील पिंपळे सौदागर येथे काही विद्यार्थी कॉलर असलेले शर्ट घालून आले असता विद्यार्थ्यांच्या शर्टाचे कॉलर कात्रीने कापून नंतरच त्यांना परीक्षेला बसू देण्यात आले.