मुंबई: 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘न्यू इंडिया’ अशा कॅप्शनसह लष्कराच्या डॉग युनिटचा फोटो ट्विट केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अॅड.अटलबिहारी दुबे यांनी ही तक्रार नोंदवली आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने करतानाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. लष्कराच्या डॉग युनिटनेही योग करतानाचे फोटो पोस्ट केले होते. या फोटोत प्रशिक्षित स्नायपर कुत्रेदेखील योगासने करताना दिसत होते. या डॉग युनिटचे फोटो पोस्ट करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘न्यू इंडिया’ अशी फोटो ओळ लिहिली. यानंतर ते सोशल मीडियावर खूप ट्रोल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणांमध्ये बदलत्या भारतासंदर्भात बोलताना ‘न्यू इंडिया’ असा उल्लेख वारंवार करतात. राहुल गांधी मोदींच्या या न्यू इंडियावर आधीच टीका करत होतो. पण त्यांनी थेट आर्मी डॉग युनिटच्या फोटोचे वर्णन ‘न्यू इंडिया’ असे केल्यानंतर लोकांना ते फारच खटकलं आणि त्यांच्या ट्विटवर टिकेचा भडीमार झाला.