राज्य सरकारचा मोठा निर्णय…
मुंबई – प्रत्येक घरात नवे स्मार्ट वीज मीटर येणार, मोबाईल रिचार्जप्रमाणे मीटर रिचार्ज करावे लागणार, अशा प्रकारच्या अनेक चर्चा आजवर राज्यात झाल्या. राज्य सरकारने अंमलबजावणीच्या दृष्टीने बरीच कार्यवाही देखील केली आहे. पण आता प्रत्यक्षात स्मार्ट मीटर लागणार असून तुमच्या प्रत्येकाच्या घरी अदानी कंपनीचे स्मार्ट वीज मीटर लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने राज्यभरात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याच्या तयारीत केली आहे. वेळेवर बिल भरण्यात अयशस्वी झालेल्यांसाठी स्वयंचलित वीज खंडीत करण्याची सुविधा असेल. स्मार्ट प्रीपेड मीटरची किंमत प्रत्येकी २६०० रुपये इतकी आहे. यामध्ये मोबाईल फोनप्रमाणे ऑनलाइन रिचार्ज केले जाऊ शकणार आहे. कोणते स्मार्ट मीटर बसवायचे याची निवड करण्याचे अधिकार ग्राहकांना द्यावे, अशी सूचना महावितरणने केली आहे. कंपनीने आधीच स्मार्ट प्रीपेड मीटर योजना सुरू केली आहे, जी पुरेशा प्रमाणात ग्राहकांना आकर्षित करण्यात अयशस्वी ठरली आहे.
केंद्र सरकारच्या सुधारित वीज वितरण क्षेत्र योजनेच्या पहिल्या टप्प्यात २२.८ दशलक्ष स्मार्ट मीटर बसवण्याची तयारी करत आहे. भांडुप, कल्याण, कोकण, बारामती, पुणे या भागातील मीटर अदानी ग्रूप ऑफ कंपनी बदलणार आहे. महाराष्ट्र राज्यातील एमएसईडीसीएलमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटरिंगसाठी प्रगत मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर सेवा प्रदात्याची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्यात स्मार्ट प्रीपेड मीटरिंगसाठी प्रगत मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर सेवा प्रदात्याच्या नियुक्तीसाठी सात निविदा मागवल्या होत्या. त्यापैकी सहा निविदांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
२६ हजार ९२१ कोटींचा खर्च
महाराष्ट्रामधील सर्व वीज ग्राहकांचे सर्व मीटर बदलण्यासाठी एकूण २६ हजार ९२१ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. यासंबंधीत अलीकडेच सहा टेंडर्सना मंजुरी देण्यात आली आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या निर्देशांनुसार, सरकार भारतातील आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सूचनेप्रमाणे काम करण्यात येणार आहे.