नवा व्होरियंट ‘ओमिक्रॉन’मुळे दीडपट रूग्ण वाढीची शक्यता

जळगाव : ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नवीन व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी आणि लसीकरणाचे नियोजन योग्यरितीने करावे, आरोग्य सुविधा मुबलक असाव्यात यादृष्टीने सर्व यंत्रणेने कार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या आहेत. दरम्यान, नव्या व्हेरीयंटमुळे दीडपट रूग्ण वाढीची शक्यता असल्याने बैठकीत याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असून, उपाययोजनांसाठी मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘ओमिक्रॉन’ हा नवीन व्हेरिअंट आढळल्यानंतर उपाययोजना म्हणून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बैठक घेतली. महाविद्यालये, वस्तीगृहे, पेट्रोलपंप, रेल्वेस्टेशन, बसस्थानके, महात्मा फुले मार्केट या ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारण्यात येऊन लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, मोहाडी रुग्णालयात पुरेशा ऑक्सिजनच्या उपलब्धेतेसह जेथे ऑक्सिजन निर्मितीचे काम अपूर्ण आहे ते मार्गी लावा, अशा सूचना दिल्या. यात काही ठिकाणी ट्रान्सफार्मरचे काम बाकी असून, ते तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. यासोबतच प्रत्येक आयसीयू, ऑक्सिजन बेडचे नियोजन करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक ोडॉ. एन.एस. चव्हाण, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, मनपाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलाणी यांच्यासह सा.बां. विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लस नाही तर तिकीट नाही, ग्राहकांची खातरजमा करा
ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांना रेल्वे, बस व खाजगी ट्रॅव्हल्सचेही तिकीट देऊ नये. दुकानांवर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाने लस घेतली आहे की नाही, याची व्यावसायिकांकडून खात्री व्हावी, यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे.

मार्केटमध्ये लस तपासणी केंद्र
महात्मा फुले मार्केट व इतर ठिकाणीदेखील व्यापारी, नागरिकांनी लस घेतली आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी सुद्धा नियोजन करावे, कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन लस जिल्ह्यात सर्वांपर्यंत पोहचतील या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राऊत यांनी या बैठकीमध्ये दिल्या.