कोलकाता- भाजपाध्यक्ष अमित शाह यांना पश्चिम बंगालमध्ये ‘रथयात्रा’ काढण्याची परवानगी कोलकाता उच्च न्यायालयाने नाकारली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 जानेवारी रोजी होणार आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठाने याबाबतचा निर्णय दिला.
रथ यात्रेमुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकतो, पश्चिम बंगालमध्ये जातीच्या आधारावर फूट पाडण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे असे पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. त्यावर रथ यात्रा शांततेत पार पडेल असे भाजपाची बाजू मांडणारे वकील अनिंद्या मित्रा म्हणाले. मात्र न्यायालयाने परवानगी देण्यास नकार दिला.
यापूर्वी काल बुधवारी रथ यात्रेला परवानगी मिळावी यासाठी भाजपाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. रथयात्रेची परवानगी घेण्यासाठी आतापर्यंत पोलीस महासंचालक, पोलिस महानिरीक्षक, गृहसचिव यांना निवेदने देण्यात आली मात्र, त्यांच्याकडून आतापर्यंत कोणताही प्रतिसाद आला नाही, असे सांगत भाजपाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्याने हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.