मुलावर आरोप केल्याने राहुल गांधींविरोधात शिवराजसिंह चौहान दाखल करणार मानहानीचा दावा

0

भोपाळ- मध्यप्रदेशात निवडणुकीची धूमधाम सुरु आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलेच रंगल्याचे दिसत आहे. काल सोमवारी राहुल गांधी यांनी भाजपाचा गड समजल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये रोड शो करुन आपल्या ताकदीचा अंदाज घेतला. यादरम्यान त्यांनी पनामा पेपर आणि व्यापम घोटाळ्याचा उल्लेख करत शिवराज आणि त्यांचा मुलगा कार्तिकेय यांच्यावर हल्लाबोल केला.

आपल्या मुलावर राहुल गांधी यांनी आरोप केल्यामुळे शिवराजसिंह चौहान चांगलेच भडकले असून त्यांनी काँग्रेस अध्यक्षांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची घोषणा केली आहे. राहुल गांधी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मी त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसकडून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर बेबनाव आरोप करत आहेत. आम्ही सर्वांचा मान ठेवत मर्यादा राखतो. पण आज तर राहुल गांधी यांनी माझा मुलगा कार्तिकेय याचे नाव पनामा पेपर्समध्ये आल्याचे सांगून कहर केला आहे.