बर्मिंगहॅम : विश्वचषक स्पर्धेत सुमार कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा न्यूझीलंडने पुन्हा एकदा पराभव केला. त्यामुळे न्यूझीलंडने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेतली. कर्णधार केन विलियम्सनच्या नाबाद शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपली अपराजित मालिका कायम राखताना दक्षिण आफ्रिकेचा ४ गड्यांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने ४९ षटकात ६ बाद २४१ धावा केल्यानंतर न्यूझीलंडने ४८.३ षटकात ६ बाद २४५ धावा केल्या. विलियम्सनने संयमी खेळी करताना अखेरपर्यंत नाबाद राहत १३८ चेंडूत ९ चौकार व एका षटकारासह १०६ धावा केल्या.
पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी ४९ षटकांचा खेळविण्यात आला. एजबस्टन स्टेडियमवर नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने आफ्रिकेला मर्यादित धावसंख्येत रोखले. मात्र, धावांचा पाठलाग करताना मार्टिन गुप्टील (३५), कॉलिन मुन्रो (९), रॉस टेलर (१), टॉम लॅथम (१), जेम्स नीशाम (२३) हे अपयशी ठरल्याने किवींनी अर्धा संघ १३७ धावांत गमावला. ख्रिस मॉरिसने किवींचे कंबरडे मोडताना ४९ धावांत ३ बळी घेतले. परंतु, विलियम्सनने कॉलिन डी ग्रँडहोमसह सहाव्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी करत न्यूझीलंडला सावरले. ग्रँडहोम ४७ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह ६० धावा करुन परतला. मात्र विलियम्सनने अखेरपर्यंत नाबाद राहत वैयक्तिक शतक पूर्ण करतानाच संघाचा विजयही साकारला.