उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये सात ठिकाणी एनआयएची छापेमारी !

0

लखनौ-पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील सात ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) छापेमारी केली आहे. एनआयएच्या पथकाने उत्तर प्रदेशमधील अमरोहा आणि हापूडसह अन्य ठिकाणांवर छापे टाकले आहेत. हापूड येथे दोन संशयित युवकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात येते.

२६ डिसेंबरला एनआयएने आयसिस मॉड्यूल ‘हरकत उल हर्ब ए इस्लाम’चा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी उत्तर प्रदेश आणि नवी दिल्लीतील १६ ठिकाणांवर छापे टाकले होते. त्याचबरोबर १० जणांना अटकही केली होती. यातील ५ जण अमरोहा जिल्ह्यातील रहिवासी होते. या खुलाशानंतर एनआयएचे पथक लखनौ येथेही पोहोचले होते. येथूनही एका मायलेकाला अटक करण्यात आली होती.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी एनआयएने हापूड येथील पिपलेंडा गावात राहणाऱ्या ताहीर नावाच्या व्यक्तीच्या घरावर छापा मारला होता. यादरम्यान शहजादला ताब्यात घेण्यात आले. एनआयएच्या पथकाने शहजादकडून काही महत्वपूर्ण दस्ताऐवज, पुस्तके आणि चिप जप्त केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहजादने दिलेल्या माहितीवरून एनआयएने छापे टाकण्यास सुरूवात केली आहे.