निपाह व्हायरसचा धोका वाढत असल्याने आरोग्य विभागाची तातडीची बैठक

0

मुबई-केरळमधील नागरिकांवर हल्ला केलेल्या निपाह व्हायरसचा धोका वाढत असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने तातडीची बैठक घेतली. यामध्ये या आजाराचे स्वरुप, केरळमधील सद्यस्थिती आणि हे संकट महाराष्ट्रात आल्यास कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी लागेल याविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीला आरोग्य आरोग्य संचालक, सचिव, आयुक्त उपस्थित होते. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु असून केरळ हे पर्यटनस्थळ असल्याने महाराष्ट्रातील बरेच नागरिक याठिकाणी फिरायला गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे केरळमधून येणाऱ्या नागरिकांबाबत विशेष काळजी घ्यावी लागेल याबाबत चर्चा झाली.

महाराष्ट्रात अद्याप या विषाणूचा संसर्ग झालेला नसला तरीही भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी काळजी घेण्याच्यादृष्टीने काही गोष्टी ठरविण्यात आल्या. नागरिकांबरोबरच रुग्णालयातील डॉक्टर आणि सिस्टर यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन कऱण्यात आले आहे. या आजाराच्या लक्षणांचा रुग्ण आढळल्यास त्याला ठेवण्यासाठी रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात यावेत अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. निपाह या आजारावर अद्याप कोणतेही ठोस औषध सापडले नसल्याने त्याबाबत खबरदारी घेणे जास्त महत्त्वाचे आहे.

हा आजार झाल्यानंतर त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक असल्याने त्याचा फैलाव होणे ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले जात आहे. ताप, डोकेदुखी, विस्मरण, आळस येणे ही या विषाणूची लागण झाल्याची प्राथमिक लक्षणे आहेत. तर कोमात जाणे आणि मृत्यू ही त्याची गंभीर लक्षणे आहेत. या आजारामुळे केरळमध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून त्यात एका परिचारिकेचा समावेश आहे. येत्या काळात राज्यात हा आजार पसरु नये या दृष्टीने आरोग्य विभागाकडून काही महत्त्वाच्या सूचना देण्यात येतील त्यांचे पालन करावे असेही सांगण्यात आले आहे.