निपाह विषाणू संसर्गामुळे ११ जणांचा मृत्यू

0

थिरूवनंतपुरम –केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात घातक आणि अत्यंत दुर्मीळ अशा निपाहच्या विषाणू संसर्गामुळे हाहाकार माजवला आहे. या विषाणुच्या संसर्गामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सुमारे ५ ते ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. तर २५ रूग्ण डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. केरळच्या आरोग्य मंत्री के के शैलजा यांनी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांबरोबरील आपत्कालीन बैठकीनंतर केरळमध्ये या व्हायरसमुळे ११ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, आरोग्य विभागाने हाय अलर्ट जाहीर केला आहे. रूग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय संशोधन संस्थेत पाठवण्यात आले आहे.

मणिपूर येथील प्रयोगशाळेत हा अत्यंत दुर्मीळ असा निपाह विषाणू असल्याचे समोर आले. दरम्यान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी या विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्राची मदत मागितली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी त्यांचा मतदारसंघ वताकरा येथील कुट्टियाडी आणि पेरम्ब्रासह अनेक ठिकाणी हा घातक विषाणू आढळून आल्याचे म्हटले आहे.

जे पी नड्डा यांनी याप्रश्नी एक उच्चस्तरीय डॉक्टरांची समिती नेमली आहे. हे पथक केरळला पोहोचले असून केंद्रीय आरोग्य मंत्रालय यावर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचे नड्डा यांनी सांगितले.