मुंबई:ईडीने मुंबई विभागाचे विशेष संचालक विनीत अग्रवाल यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. नीरव मोदी आर्थिक घोटाळा प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांना योग्य प्रक्रियेचे पालन न करता कार्यमुक्त करण्याच्या निर्णयामुळे अग्रवाल यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
अग्रवाल यांचा कार्यकाळ तीन वर्षांनी कमी करण्यात आला आहे. १९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या अग्रवाल यांना गृह विभागात पाठवण्यात आले आहे. मुंबईतील ईडीचा विशेष संचालक हा पश्चिम विभागाचा प्रमुख असतो. महाराष्ट्रासह, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर त्याचे नियंत्रण असते. मुंबईच्या संचालकांचा कारभार आता चेन्नईतील विशेष संचालकांना सुपूर्द करण्यात आला आहे. अग्रवाल यांना २०१७ मध्ये ईडीत प्रतिनियुक्तीवर आणण्यात आले होते. २९ मार्च रोजी संयुक्त संचालक सत्यव्रत कुमार यांना नीरव मोदी चौकशी प्रकरणातून हटवल्यानंतर अग्रवाल चर्चेत आले होते.