निरव मोदी संबंधीत कागदपत्रे सुरक्षित

0

मुंबई-नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्याविरोधातील पीएनबी घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे सुरक्षित असून ही कागदपत्रे आगीमध्ये नष्ट झाले नसल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे. दक्षिण मुंबईतील आयकर विभागाच्या सिंधिया हाऊसमधील कार्यालयाला लागलेल्या आगीमध्ये नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्याविरोधातील पीएनबी घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे जळाल्याचे वृत्त काही माध्यमांमधून झळकले होते. पण हे वृत्त चुकीचे असल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.

दुसऱ्या इमारतीत स्थलांतरीत

नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्याशी संबंधित सर्व कागदपत्रे दुसऱ्या इमारतीत यापूर्वीच स्थलांतरीत करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधातील कागदपत्रे आणि सर्व पुरावे सुरक्षित आहेत, असे आयकर विभागाने रविवारी ट्विटरद्वारे स्पष्ट केले.

वृत्त चुकीचे

शुक्रवारी संध्याकाळी मुंबईच्या सिंधिया हाऊस इमारतीला भीषण आग लागली होती. अनेक तासांच्या प्रय़त्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर ताबा मिळवला होता. या इमारतीत आयकर विभागाचे कार्यालयही आहे. त्यामुळे या आगीत नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्याविरोधातील कागदपत्रं जळाल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिलं होते, पण हे वृत्त पूर्णतः चुकीचे असल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.