औरंगाबाद- औरंगाबादस्थित नॉनस्टिक कुकवेअर क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी निर्लेप अॅप्लायन्सेस बजाज इलेक्ट्रिकल्सने विकत घेतली आहे. सुमारे ८० कोटी रुपयांत हा करार झाला आहे. यात निर्लेप कंपनी, ब्रँड आदींची मालकी आणि देणीही बजाजकडे आली आहेत. ५० वर्षांपूर्वी म्हणजेच १९६८ मध्ये स्थापन झालेल्या निर्लेपचा स्वयंपाकाच्या भांड्यांत नॉनस्टिक तंत्रज्ञान अवलंबणाऱ्या पहिल्या कंपन्यांत समावेश होतो.
युरोपात उत्पादने निर्यात
तसेच युरोपमध्ये आपली उत्पादने निर्यात करणारी ही या क्षेत्रातील पहिली कंपनी आहे. बजाज इलेक्ट्रिकल्सने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, आम्ही निर्लेपचे पूर्ण शेअर्स सुमारे ४२.५० कोटींत विकत घेण्याचे ठरवले आहे. यात अधिग्रहण होईपर्यंत कंपनीची कर्जे आणि देणींचाही अतिरिक्त समावेश असेल. अधिग्रहणामुळे वेगाने विस्तारत असलेल्या १२ हजार कोटी रुपयांच्या किचनवेअर बाजारपेठेत कंपनीला आपली जागा भक्कम करता येईल.
कर्ज बजाजकडे
निर्लेपचे संचालक मुकुंद भोगले यांनी सांगितले की, आम्ही निर्लेपमधील पूर्ण वाटा ८० कोटींत विकण्याचे ठरवले आहे. यात करारात १०० टक्के इक्विटीसाठी ४२.५० कोटी आणि ३० कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे. हे अधिग्रहण दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात ६० दिवसांत ८० टक्के शेअर्स हस्तांतरित करण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात क्लोजिंग डेटनंतर कॉल ऑप्शनद्वारे कोणत्याही मुदतीत उर्वरित २० टक्के शेअर्स विकत घेण्याचा हक्क असेल. निर्लेप अॅप्लायन्सेस कंपनीत जवळपास ५०० कर्मचारी आहेत. २०१८ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीची उलाढाल १०० कोटींची होती. गेल्या तिमाहीत बजाज इलेक्ट्रिकल्सचे उत्पन्न ४,७०० कोटी रुपये होते.