नवी दिल्ली- निर्मला सीतारमन या राफेल करारावरुन संसदेत वारंवार खोट्या बोलत असून त्या संरक्षण मंत्री नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रवक्त्या आहेत, अशी जहरी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. हवाई दल आणि संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राफेल करारात निर्मला सीतारमन यांच्या हस्तक्षेपावर आक्षेप घेतला होता की नाही, याचे सरकारने आधी उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मोदींनी राफेलबाबत संसदेत माझ्याशी १५ मिनिटे चर्चा करावी, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
सीतारमन यांच्या उत्तरानंतर राहुल गांधी यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना सीतारमन यांच्यावर टीका केली. ‘सीतारमन यांनी संसदेत आधी सांगितले की हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत (एचएएल) १ लाख कोटींचे करार करण्यात आले. मग आम्ही हा दावा फेटाळून लावला. आता आज त्या संसदेत माहिती देतात की २६ हजार कोटींचे करार करण्यात आले. यावरुन सीतारमन संसदेत खोटे बोलल्याचे स्पष्ट होते’, असे राहुल गांधींनी सांगितले. अनिल अंबानींना ३० हजार कोटी रुपये दिले की नाही?, हा प्रश्नही अजून अनुत्तरीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.