नवी दिल्ली : रस्ते सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची आणि अपघातांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी काँग्रेस आणि इतर काही विरोधी पक्षांनी लोकसभेत केली. त्याचवेळी भाजपचे खासदार तापीर गाव यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना देशात रस्त्यांचे जाळे विणणारे ‘स्पायडरमॅन’ म्हणत रस्तेबांधणीसाठी सरकारचे कौतुक केले.
लोकसभेत ‘2022-23 या वर्षासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील अनुदानाच्या मागण्या’ या विषयावर चर्चा सुरू झाली. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा अमरावती आणि हैदराबादमधील रस्ते संपर्क वाढवण्यावर भर देतो. अशा परिस्थितीत यात काय प्रगती झाली, हे सरकारने सांगावे, असा प्रश्न वायएसआर काँग्रेस पक्षाचे एम भरत यांनी केला.
रस्ते बांधणीत पूर्वीच्या काँग्रेस सरकारने केलेल्या कामामुळे आज भारत रस्त्यांच्या बाबतीत जगात दुसर्या क्रमांकावर आहे. रस्त्यांच्या गुणवत्तेत जर्मनी प हिल्या क्रमांकावर आहे. मात्र, भारत 44 व्या क्रमांकावर आहे. सरकार रस्त्यांच्या दर्जाकडे पूर्ण लक्ष देत नाही. रस्ता सुरक्षेसाठी वाटप केलेल्या बजेटपैकी फक्त दोन टक्के खर्च केला जातो, तर अमेरिकेत बजेटच्या सहा टक्के खर्च केला जातो, असे काँग्रेसचे एमके विष्णू प्रसाद म्हणाले. यावर मी नितीन गडकरी यांना ‘स्पायडरमॅन’ असे नाव दिले आहे. कारण, त्यांनी रस्त्यांचे जाळे विणले आहे. मोदी सरकार आल्यानंतर चीनच्या सीमेजवळ रस्ते बांधणीचे काम वेगाने सुरू आहे, असे चर्चेत भाग घेताना भाजपचे तापीर गाव म्हणाले. आपल्या राज्यातील अनेक रस्त्यांच्या बांधकामाचा संदर्भ देत अरुणाचल प्रदेशचे लोकसभा सदस्य म्हणाले, मोदी है तो मुमकीन है, गडकरी है तो मुमकीन है. मला आशा आहे की ‘स्पायडरमॅन’ ज्या गतीने रस्ते बांधत आहे त्याच गतीने पुढे जात राहील.