नितीन गडकरींना दिल्लीत धमकी, नागपुरातील निवासस्थानी सुरक्षेत वाढ

नागपूर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी अज्ञात आरोपींनी फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे नागपूर पोलिसांनी सावध पवित्रा घेत नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी आणि त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. गडकरी यांच्या निवासस्थानी बॉम्बशोधक नाशक पथक तसेच सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नितीन गडकरी यांना यापूर्वी कर्नाटकमधील बेळगाव जिल्हा कारागृहातील जन्मठेपेचा आरोपी जयेश पुजारी याने १०० कोटी रुपयांची खंडणी मागून बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी जयेश पुजारी याला अटक करून त्याच्यावर एपीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.